खामगाव नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली २७ व २८ जून २०२५ रोजी शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी टिळक मैदान व मस्तान चौक परिसरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.
या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जून रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मस्तान चौक व टिळक मैदान परिसरातील अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांनी पालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ती भेदभावपुर्ण असल्याचा आरोप सानंदा यांच्या समोर मांडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंजाबराव देशमुख, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासने, मनोज वानखडे, केशव कापले, आबीद उलहक, सैयद इमरान, मुकद्दर खान, काकू पठाण, अजिज चायवाले, हाजी लतीफ सेठ, सादिक नवाज पठाण आदी उपस्थित होते.
सानंदा यांनी परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नसीब फूड मार्टचे संचालक हाजी बुढन खाँ यांनी नगर परिषदेने आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप केला आणि या कारवाईमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, काही राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींच्या अतिक्रमणावर कारवाईच झाली नाही.
सानंदा यांनी व्यापाऱ्यांना धीर देत त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली आणि या प्रकरणात योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले.