प्रतिनिधी,खामगाव
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुका पार पडणार असून, या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प घ्यावा, असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
रविवार, १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खामगाव येथील गांधी चौक कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील सर्कलनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सानंदा बोलत होते.
बैठकीत आगामी निवडणुकांबाबत इच्छुक उमेदवारांशी चर्चा झाली. प्रत्येक सर्कलनिहाय चाचपणी करून उमेदवारांची तयारी तपासण्यात आली. अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची संमतीही दर्शवली.
या वेळी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, लायसन कमिटी सभापती विलाससिंग इंगळे, बांधकाम समिती सभापती गणेश ताठे, संचालक श्रीकृष्ण टिकार, ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख, मनोज वानखडे, जयराम मुंडाले, माजी सरपंच गणेश पाटील, युवक काँग्रेसचे रोहित राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत “अजित पर्व, एकच वादा – अजितदादा” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मनोज वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष पेसोडे यांनी मानले.