सकल माळी समाजाच्या वतीने नांदुरा शहरात उपवर युवक-युवती परिचय संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी उपवर युवक-युवती परिचय संमेलन २०२५ संमेलनाचे तिसरे वर्ष असून या परिचय संमेलनाच्या कार्यकारिणी निवड बैठकीचे आयोजन शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्री संत सावता माळी भवन, नांदुरा येथे करण्यात आले आहे.
समाजाने समाजासाठी सामाजिक कार्य या ध्येयाने सुरू झालेल्या परिचय संमेलनाला गेल्या दोन वर्षांपासून समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त पाठबळ मिळत आहे. दोन वर्ष मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे तसेच पारदर्शकता, स्पष्टपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत हे संमेलन निशुल्क घेण्याचा निर्णय आयोजकांनी यावर्षी घेतला आहे. आयोजकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गोर गरीब, मध्यमवर्गीय व अल्पभूधारक शेतकरी समाज बांधवांना याचा लाभ मिळणार आहे.
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कार्यकारिणी गठीत करणे, पुढील रूपरेषा ठरविणे तसेच ग्रामीण भागातील समाज बांधवांना योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वांचा मान-सन्मान राखत समाजकार्य करण्यास आयोजक कटिबद्ध असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात येईल.
मेळावा आयोजकांच्या वतीने सर्व समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ मार्गदर्शक आणि नोंदणी प्रमुख यांना उद्याच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.