सामाजिक कार्यकर्ते, सुरेश दादा पेठकर
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा शहरात सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या ठिकाणी मच्छरांचा उपद्रव वाढल्यामुळे आणि विविध प्रकारच्या रोगराईचा धोका निर्माण झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर यांनी नांदुरा नगरपालिका प्रशासनाकडे औषधी धूर फवारणी करण्याची मागणी केली आहे.
शहरातील गटारी, नाले आणि इतर निचऱ्याच्या भागांत साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा सुरू होताच नांदुरा नगरपालिका आरोग्य विभागामार्फत धूर फवारणीसारखी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी, अशी ठाम मागणी सुरेश दादा पेठकर यांनी केली आहे. विशेषतः बाजारपेठ, गर्दीचे भाग, शाळा परिसर आणि दाट वस्ती असलेल्या क्षेत्रात या फवारणीचे आयोजन तातडीने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय मुख्याधिकारी मिलिंदजी दारोकार आणि आरोग्य विभागाने तत्काळ लक्ष घालून शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी निगडित कोणतीही बाब दुर्लक्षित होता कामा नये. धूर फवारणीसारख्या प्राथमिक उपाययोजना तातडीने राबविल्या गेल्यास शहरातील संभाव्य रोगराई रोखता येऊ शकते, असेही सुरेश दादा पेठकर यांनी स्पष्ट केले.