अफ्रिकन सफारी' आता नागपूरमध्ये!

मराठी न्यूज माझा
0

नागपूर,

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ गोरेवाडा झू लिमिटेड, नागपूर आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) यांच्यामध्ये दूरदर्शी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार 'बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान प्रकल्प, नागपूर'च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत अफ्रिकन सफारी, सफारी प्लाझा व इतर संबंधित विकासकामांसाठी आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी सुरु करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. या करारानुसार गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सुमारे 63 हेक्टर क्षेत्रावर अफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार असून, त्यात सुमारे 22 अफ्रिकन प्रजातींचा समावेश असणार आहे. यामुळे आता येथे माऊंटेड बेटांवर दिसणारे प्राणी ज्यामध्ये आफ्रिकन सिंह, चित्ता, ठिपकेदार तरस, चिंपाझी, रेड रिव्हर हॉग, हमाड्रायस बबून, पांढराशिंगी गेंडा, पाटस मंकी तसेच मुक्त संचार करणारे प्राणी, शहामृग, जिराफ, झेब्रा, ब्लू विल्डबीस्ट, कुडू, इम्पाला, कॉमन ईलंड, जेम्स बॉक, पाणगेंडा हे प्राणी पाहायला मिळणार आहे. 

या प्रकल्पासाठी ₹285 कोटींचा निधी निर्धारित असून, 18 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही अफ्रिकन सफारी पूर्णत्वास आल्यानंतर नागपूर हे प्राणीसंग्रहालय पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणार असून, यामार्फत जैवविविधतेचे संवर्धन होणार आहे. 

प्रकल्पाची पार्श्वभूमी:

इंडियन सफारीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण 26 जानेवारी 2021 रोजी झाले.

NBCC ही केंद्र सरकारची राष्ट्रीय संस्था दुसऱ्या टप्प्यातील हे बांधकाम पार पाडणार आहे.

यावेळी मंत्री गणेश नाईक आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)