इयत्ता ११वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी २.५८ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

मराठी न्यूज माझा
0

 


मुंबई, दि. २६ मे

इयत्ता ११वी (एफवायजेसी) प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठीचे ऑनलाईन नोंदणी पोर्टल आज सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. या पहिल्याच दिवशी राज्यभरातून तब्बल २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती शिक्षण संचालक व राज्यस्तरीय प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील ९,३३८ महाविद्यालये सहभागी असून, १८,७४,९३५ जागा 'केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया' (CAP) अंतर्गत उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांची निवड करण्याची सुविधा पोर्टलवर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून, त्यामध्ये दिलेल्या प्राधान्यक्रम, आराखडा आणि गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

व्यवस्थापन, संस्था अंतर्गत व अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश रद्द करण्याची कार्यपद्धती नीट समजून घेणे आवश्यक आहे.

प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी ‘संमती’ अनिवार्यपणे नोंदवावी लागेल.

प्रथम फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

५ जून २०२५ रोजी तात्पुरती सर्वसाधारण प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.

मार्गदर्शन व सहाय्यता उपक्रम :

विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत व्हावी यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती माहिती पुस्तिकेत आणि पोर्टलवर उपलब्ध आहे. अडचणी सोडवण्यासाठी विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावर मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

तांत्रिक किंवा इतर कोणतीही अडचण असल्यास ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [support@mahafyjcadmissions.in(mailto:support@mahafyjcadmissions.in) या ई-मेलवर मदत मागवावी, असे आवाहन डॉ. पालकर यांनी केले आहे.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)