नांदुरा,
तालुक्यातील वसाळी येथील श्री क्षेत्र खंडोबा भवानी संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडले. दिनांक ६ मे २०२५ पासून सुरू झालेल्या या शिबिरात शेकडो बालकांनी सहभाग घेतला.
या शिबिरात मुलांना योगासन, हरिपाठ, संस्कृत शिक्षण, भक्तिगीते आणि पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह. भ. प. श्री बळीराम महाराज ढोले (श्री क्षेत्र खंडोबा भवानी संस्थान, वसाळी) यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीने शिबिरार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि ऊर्जा संचारित केली.
बळीराम महाराज ढोले हे कीर्तनकार व भगवतकार म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे कीर्तन हे तेजस्वी वाणी आणि वात्सल्यभावाने भरलेले असते. त्यांच्या मार्गदर्शनातून दरवर्षी अनेक बाल-कीर्तनकार घडत असून, शिबिर संपल्यानंतर ही मुले घरी परतल्यानंतर हरिपाठ, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण करतात.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये वासुदेवराव भोपळे, मल्हार यांच्यासह नांदुरा व वसाळी येथील अनेक सेवेकरी मंडळींचे मोलाचे योगदान लाभले. गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद आणि सहभागामुळे शिबिर अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरले.