खामगाव प्रतिनिधी | मराठी न्यूज माझा नेटवर्क
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ३१ मे रोजीच त्यांनी हा राजीनामा दिला असून, आज (५ जून) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून याबाबत अधिकृत माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
सानंदा हे काँग्रेसकडून सलग तीन वेळा आमदार राहिले असून, पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात गेल्या ४० वर्षांपासून सक्रिय होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील काही घडामोडींमुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी आपली नाराजी अधिकृत राजीनाम्याद्वारे व्यक्त केली आहे.
पक्षविरोधकांनाच जबाबदारी!
राजीनाम्यात सानंदा यांनी नमूद केले आहे की, "मी खामगाव विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस पक्षाचा स्थानिक नेता असतानाही, २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या व्यक्तींनी पक्षविरोधी कारवाया करून भाजपाच्या उमेदवाराला मदत केली, त्याच लोकांना २६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित 'सद्रावना संकल्प सभा'ची जबाबदारी देण्यात आली. हे अत्यंत खेदजनक आहे."
या संदर्भात खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सरस्वतीताई खासने यांनी २४ एप्रिल रोजी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, ही बाब पक्षातील शिस्तीच्या प्रश्नांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते, असे सानंदा यांनी म्हटले आहे.
"पक्षासाठी तन-मन-धनाने कार्य केलं, पण..."
"गेल्या चार दशकांत मी पक्षाच्या विचारधारेप्रती एकनिष्ठ राहून संघटनबांधणीसाठी तन-मन-धनाने योगदान दिलं. पक्षाने मला नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार म्हणून अनेक संधी दिल्या, याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे," असे सानंदा यांनी नमूद केलं.
तरीही सध्याच्या परिस्थितीत पक्षात दुर्लक्षित केलं जात असल्यामुळे, आपल्याजवळील सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या व सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील वाटचालीकडे लक्ष
सानंदा यांच्या या निर्णयामुळे खामगावात काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा खामगावातील एक मजबूत आधारस्तंभ गमावल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.