मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत या निर्णयामागची पार्श्वभूमी आणि भविष्यातील अपेक्षांची सविस्तर माहिती दिली.
बँकेला मोठ्या घोटाळ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मोठा घोटाळा झाल्यामुळे बँक आर्थिक संकटात सापडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांवर अवलंबून राहावे लागले. या पार्श्वभूमीवर आ. आशिष देशमुख यांनी पुढाकार घेत बँकेवर प्रशासक नेमण्याचा विषय मांडला. त्यानंतर विद्याधर अनास्कर यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून नेमण्याचा प्रस्ताव पुढे आला. देशात पहिल्यांदाच राज्य सहकारी बँकेला नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकपदी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
राज्य सहकारी बँकेच्या नेतृत्वाखाली बँकेच्या उभारणीस चालना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, राज्य सहकारी बँकेची धुरा विद्याधर अनास्कर यांच्याकडे सोपवल्यानंतर बँकेला दरवर्षी ₹600 कोटींचा नफा मिळाला. आता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेला 3 वर्षांसाठी संस्थात्मक प्रशासकपदी नेमण्यात आले आहे. यामुळे बँकेच्या स्थैर्याला हातभार लागणार असून ठेवीदारांचे हित सुरक्षित राहणार आहे. राज्य सहकारी बँकेने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची हमी घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
सहकार क्षेत्राला नवी दिशा – 2 लाख बहुउद्देशीय संस्था उभारणीचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशभरात 2 लाख बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्था उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यापैकी 10 हजार संस्था महाराष्ट्रात उभारल्या जातील. पहिल्या टप्प्यात 886 संस्था उभारण्यात आल्या आहेत. या संस्थांचे 13 प्रकारचे व्यवसाय करता येणार असल्यामुळे गावागावांत समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
बँकिंग आदेशही लवकरच लागू
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व सरकारी विभागांनाही नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबत बँकिंग करण्याचे आदेश लवकरच लागू केले जातील. यामुळे बँकेच्या कामकाजाला गती मिळेल आणि आर्थिक स्थैर्य वाढेल.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या वेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकज भोयर, मंत्री आशिष जयस्वाल, आ. आशिष देशमुख, आ. चरणसिंग ठाकूर, विद्याधर अनास्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्य सहकारी बँकेच्या या नियुक्तीमुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नवसंजीवनी मिळणार असून, सहकार क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याची संधी निर्माण झाली आहे.