जय जिजाऊ…जयघोषाने दुमदुमले मातृतीर्थ !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस असून त्यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी ‘राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सुर्योदयावेळी शासकीय महापुजा करण्यात आली.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते महापुजा
या जन्मोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून लाखो लोक राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी येत असतात. मॅा जिजाऊ साहेब यांच्या रुपाने सिंदखेड राजा नगरीला आदर्श माता, पूत्र घडविणारी राष्ट्रमातेची नगरी म्हणून जगभरात दर्जा प्राप्त झाल्याचे सांगून राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
विद्युत रोषणाई, फुलांच्या माळांनी सजले मातृतीर्थ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. दरवर्षीप्रमाणे या जन्मस्थळी मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला लखुजीराजे जाधव यांचा राजवाड्याची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती.
शाळकरी विद्यार्थांमध्येही उत्साह
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात हजारो जिजाऊप्रेमींची गर्दी होती. या सोहळ्यात शाळकरी मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला होता. यावेळी मॅा जिजाऊ जन्मोत्सवाचा शाळकरी विद्यार्थांमध्येही उत्साह दिसून येत होता.